वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी घुसून हिंसाचार केला. या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांची अधिकृत निवड करण्याच्या वेळेस हा हिंसाचार झाला. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.
जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.
#UPDATE | US lawmakers reconvene to certify Electoral College votes after the violence at the US Capitol in Washington DC. https://t.co/W1e3J1JkJf
— ANI (@ANI) January 7, 2021
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जवळपास चार तास ही झटापट सुरु होती. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने १२ तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट ब्लॉक केले असून त्यांचे तीन व्हिडीओ हटवले आहेत. यासोबतच ट्विटरने नियमांचे उल्लंघन झाल्यास अकाऊंट कायमचे बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, फेसबुकनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे.