बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि जंक फूडचे सेवन यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. विशेषतः उच्च रक्तदाबाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र भारतीय परंपरेतील प्राचीन योगसाधनेमुळे उच्च रक्तदाबासह मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. केवळ तीन महिन्यांच्या योगा थेरपीने 140 असलेला रक्तदाब 130 पर्यंत कमी होतो, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
बंगळूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स (छखचक-छड) येथील इंटेग्रेटिव्ह मेडिसिन विभागात उच्च रक्तदाब, स्ट्रोक, नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया यांसारख्या आजारांवर योगा थेरपीच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत. त्यामुळे योगा आता केवळ व्यायाम न राहता जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग ठरतो आहे.
योगा आणि योगा थेरपीमधील फरक
सामान्य योगाभ्यासात सर्वांसाठी सारखेच आसन – प्राणायाम केले जातात. मात्र योगा थेरपीमध्ये रुग्णाला झालेल्या आजारानुसार त्याचा वैद्यकीय इतिहास लक्षात घेऊन वैयक्तिक सल्ल्यानुसार उपचार दिले जातात. पंचकोश – अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोषांच्या शुद्धीवर भर दिला जातो. याशिवाय प्राणिक एनरजायजिंग टेक्निक, योगिक सायकोथेरपी, योगिक कौन्सिलिंगचा वापर केला जातो.
हार्मोनल समतोल राखतो
तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालिन हे हार्मोन्स स्रवतात, जे बीपी वाढवतात. योगामुळे हे हार्मोन्स नियंत्रित राहतात.
श्वसन सुधारते
गाढ आणि धिमा श्वास घेण्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन जातो, रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहतो.
हृदयावर ताण कमी होतो
शवासन, बालासन, सुप्त कोनासन यांसारख्या विश्रांतीदायक आसनांमुळे हृदयावरचा ताण कमी होतो, हृदयाचे ठोके नियमित राहतात.
कोणते योग प्रकार उपयुक्त?
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी अनुलोम-विलोम, भ्रामरी, शीतली, चंद्रनाडी प्राणायाम, उज्जायी, प्रणव जप यांचा उपयोग होतो. मात्र, उदाहरणार्थ कपालभाती हा प्राणायाम हायपरटेन्शन असलेल्या रुग्णाने केल्यास बीपी वाढू शकतो. म्हणूनच व्याधीनुसार योग्य योग प्रकार निवडणे आवश्यक आहे.
योगा थेरपी : पूरक उपचार
योगा थेरपी काही आजारांमध्ये अॅड-ऑन थेरपी म्हणून औषधांसोबत दिली जाते. स्टेज 1 हायपरटेन्शनसाठी केवळ एक ते तीन महिन्यांत परिणामकारक उपचार शक्य आहेत.
योगा थेरपीचे फायदे
मानसिक ताण नियंत्रणात : मानसिक ताणामुळे सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब वाढतो. प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रेमुळे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम सक्रिय होते, जी बीपी नियंत्रणात ठेवते.