सोलापूरात रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचा भव्य क्रिकेट महोत्सव..
पुरवठा विभाग क्रिकेट स्पर्धा ; दक्षिण सोलापूर संघाला चौथा पारितोषक
तालुका दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभाव्यतेमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप झाल्यानंतर, प्रथमच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने तसेच एक करमणूक म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय,अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लिंगराज वल्याळ, कर्णिक नगर मैदान येथे २२, २३ व २४ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मा. श्री. संतोष कुमार देशमुख व श्री. सुशांत बनसोडे (उपजिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या स्पर्धेत मोहोळ, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा तसेच पुरवठा विभागातील परिमंडळ अ, ब, क, ड या झोनसह एकूण १६ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फक्त रेशन दुकानदार, अधिकारी व ऑपरेटर यांच्यासाठी खास हा क्रिकेट सोहळा तीन दिवस रंगला.
२४ ऑगस्ट रोजी अंतिम फेरीत अधिकारी वर्ग विरुद्ध दक्षिण सोलापूर तसेच माढा संघ विरुद्ध ब झोन अशी रोमांचक लढत झाली. युट्युबवरून सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे, प्रफुल नाईक, नंदकिशोर डोके,जिल्हा सचिव राजय्या कमटम, जिल्हा प्रमुख नितीन पेंटर तसेच सर्व झोन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समालोचन मनीष काळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.