मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेली लाडक्या बहिण योजनेतील पात्र बहिणींना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने सणासुदीच्या काळात नाराज असलेल्या महिलांना आता ऑगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार की वेगवेगळ्या तारखांना याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने यासंदर्भात मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जन झाले तरी महिलांना सणासुदीच्या काळात ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबत घोषणा केली जाते. दरम्यान, अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार असल्याचे संकेत मिळत असून, याबाबतची अधिकृत घोषणा मंत्री अदिती तटकरे लवकरच करणार असल्याचे समजते. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रारंभी या योजनेत २ कोटी ६३ लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली होती. मात्र, पडताळणी झाल्यानंतर हा आकडा २ कोटी ४८ लाखांवर आला आहे.
सगळ्या विभागाकडून डेटा मागवण्यात आला होता. त्यामध्ये २६ लाख अपात्र ठरल्या आहेत. सरकारी कर्मचारी महिलांनी घेतलेला लाभ परत घेतला जाणार आहे. ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते त्यांनी घरातील पुरुषांचे खाते दिले का याची पडताळणी सुरू असल्याचे तटकरे म्हणाल्या.