नवी दिल्ली – भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरुवात होतेय. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात एकाच वेळेस लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राधान्य गटांचे लसीकरण करण्यात येईल.
भारतात एक कोटी पाच लाख 27 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर एक लाख 52 हजार जण मरण पावले आहेत. देशभरातील तीन हजार सहा लसीकरण केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी या मोहिमेचे उद्घाटन करतील.
प्राधान्य गटामध्ये आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, लष्कराचे जवान आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस मिळणार आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात लसीकरण राबवण्यासाठी निवडणुकीच्या अनुभवाची मदत घेण्यात येणार आहे.
प्राधान्य गट ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचा लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारांची यादी गृहमंत्रालयाने मागविली होती. 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना ही लस देण्यात येते. निवडणुकीच्या बुथप्रमाणे लसीकरण केंद्रावर काम चालणार आहे.
लाभार्थींच्या नावाच्य याद्यांच्या तीन प्रती तेथे असतील. ही नावे सरकारी पोर्टल को-विन वर अपलोड करण्यात येतील. शनिवारची यादी दोन दिवस आधीच अपलोड करण्यात आली आहे.
सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हे लसीकरण होणार आहे. जे पाच वाजेपर्यंत येतील त्यांना पाच वाजल्यानंतरही लस देण्यात येईल. भारत वैश्विक लसीकरण मोहिमेच्या अनुभवाचा लाभ करून घेईल, पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.