ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लसीकरण मोहिमेला सुरुवात होताच सरकारी कॉलर ट्युन बदलली

नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. दरम्यान, लसीकरणाची मोहीम सुरू होताच देशातील सर्व मोबाइलवर फोन केल्यानंतर वाजणारी सरकारी कॉलर ट्युन बदलली. नव्या कॉलर ट्युनमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला यांचा आवाज आहे.

याआधी जसलीन भल्ला आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या आवाजात कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी दोन स्वतंत्र कॉलर ट्युन तयार केल्या होत्या. कोणालाही फोन केल्यानंतर कोरोना संदर्भात जनजागृती करणारी अमिताभ अथवा जसलीन भल्ला यांच्या आवाजातील कॉलर ट्युन ऐकावी लागायची. जवळपास ३० सेकंदांची असलेली ही ट्युन ऐकल्याशिवाय कॉल करणे शक्य नव्हते. अनेक कंपन्यांनी काही दिवसांनंतर कॉलर थांबवण्याचा एक पर्याय दिला.

दरम्यान, आता नव्या कॉलर ट्युनचा आवाज ऐकू येणार आहे. त्यात जसलीन भल्ला हिंदीत म्हणतात… ‘नया साल कोविड-19 की वैक्सीन के रूप में नई आशा की किरण लेकर आया है। भारत में बनी वैक्सीन सुरक्षित और प्रभावी है। कोविड के विरुद्ध हमें प्रति-रोधक क्षमता देती है… भारतीय वैक्सीन पर भरोसा करें… अफवाहों पर भरोसा ना करें…।’ ही कॉलर ट्युन हिंदी, मराठी, इंग्रजीसह वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे.

कॉलर ट्युन वाजण्यास सुरुवात झाल्यावर एक आकड्याचे बटण दाबले तर कॉलर ट्युन वाजणे लगेच थांबायचे आणि कॉल लागायचा. पण अनेकांना कॉलर ट्युन ऐकण्याची सवय झाली होती. सोशल मीडियावर कॉलर ट्युनवरुन अनेक जोक आणि मीम्स व्हायरल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!