मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही महिन्यांत चार ते पाच वेळा भेट झाली. त्यामुळे आगामी निवडणुकांत मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच राज-उद्धव ठाकरेंची युती ही ‘दिल-दिमाग से बनी हुई’ असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या दाव्यामुळे ठाकरे बंधुंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातील. त्यामुळे नवीन मित्रपक्ष घेण्याची आवश्यकता नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच विद्यमान महाविकास आघाडी पुरेशी मजबूत आहे. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही, असे सपकाळ म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा मनसेविरोध स्पष्ट झाला असून, ठाकरे बंधुंची युती झाल्यास महाविकास आघाडीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.