मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण उद्यापासून (शुक्रवार) सुरू करण्यात येणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच, त्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहनही केले आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
पुढील 2 महिन्यांच्या E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट तयार करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती या अधिकृत वेबसाइटशिवाय अन्य कोणत्याही वेबसाइटवर शेअर करू नये, असे आवाहन विभागाने केले आहे.
ई-केवायसी प्रक्रियेमध्ये लाभार्थी महिलेची स्वतःची आधार पडताळणी तसेच, पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, ज्या महिला हे केवायसी पूर्ण करणार नाहीत, त्यांना लाभ मिळणे बंद होऊ शकते.
महायुती सरकारने जुलै 2024 पासून लागू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जातो. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे, हा महत्त्वाचा पात्रतेचा निकष आहे. त्यामुळे पात्र महिलांनी आपला मासिक लाभ सुनिश्चित करण्यासाठी विहित वेळेत अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.