पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज, दिवाळीच्या दिवशी, श्री क्षेत्र देहू येथे लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. सकाळी 9 वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ते उपोषणाला बसणार आहेत.
शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून आज दिवाळीच्या दिवशी थोड्याच वेळाच ९ वाजता श्री क्षेत्र देहूमध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या समाधीवर नतमस्तक होऊन मंदिरापुढे लाक्षणिक उपोषणाला बसतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी रविवारी या उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली. या उपोषणाबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या वडिलांच्या सावकारीच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून लोकांचे कर्ज माफ केले होते, त्यामुळे तुकोबारायांना ‘शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे’ म्हणूनही ओळखले जाते.
आज अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला तरी शेतकऱ्याची परिस्थिती दारात दिवा लावण्याइतकीही नाही. त्यामुळे त्याचे घर आज काळोखात आहे.
शेतकऱ्याच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी आणि त्याला जगण्यासाठी आशेचा किरण दाखवण्यासाठी त्याच्या गळ्यातील कर्जाचा फास काढणे आज अत्यंत गरजेचे आहे. मात्र, तरीही हे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाहीये. डोळ्यावर झापडं आलेल्या आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या या सरकारला जागं करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्यावतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
आतातरी या सरकारला शेतकरी कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी येईल, ही अपेक्षा आणि तशी सद्बुद्धी यावी, ही तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना! असे रोहित पवार म्हणालेत. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत वारकरी आघाडीचे प्रमुख ह. भ. प. श्री. दत्ता महाराज दोन्हे हेदेखील उपोषणाला बसणार आहेत