हिंगोली : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून महाविकास आघाडी फुटण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यांना या बंडासाठी भाजपकडून देखील बळ देण्यात आल्याची चर्चा या बंडाचा उल्लेख आल्यानंतर सातत्याने होत असते. बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांवर उद्धव सेनेकडून ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘५० खोके एकदम ओके’ असा नारा देखील उद्धवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदाराने ५० खोके एकदम ओके ही सत्यघटना असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही नेते जाहीर सभांमध्ये एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. पण आता मुटकुळे यांनी बाकीच्यांचे मला माहिती नाही पण शिंदेंकडून संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतले, असल्याचा मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आदल्या दिवशी ठाकरेंच्या बाजुने बोलणारे बांगर दुसऱ्या दिवशी शिंदेसोबत गेले. आदल्यादिवशी शिंदेसोबत गेलेल्या लोकांना शिव्याशाप देत होते. मात्र, अचानक ते दुसऱ्या दिवशी शिंदेंसोबत गेले मग त्यांच्या स्वप्नात ईश्वार आला होता का? असा सवालही मुटकुळे यांनी संतोष बांगर यांना विचारला आहे. त्यामुळे या खळबळजनक दाव्यामुळे भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच एका जाहीर सभेत बोलताना संतोष बांगर यांनी आपल्या घरी मध्यरात्री १०० पोलिस आले. त्यांनी आपल्या घराची झडती घेतली. यामागे आमदार तानाजी मुटकुळे असल्याचा गंभीर आरोप केला होता. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर ५० कोटी घेतल्याचा आरोप केल्याने राजकारण अधिक तापणार असल्याचे बोलले जात आहे.