ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…दोन वेळा मी मृत्यूच्या सावलीतून बाहेर आलो ; आ.मुंडेंचा विरोधकांवर हल्लाबोल !

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री व आ. धनंजय मुंडे हे अनेक अडचणीत आले होते. आता निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले असून आता ते विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत आहे. परळीतील विकासकामांवर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर पुन्हा एकदा भर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भावनिक भाषण केले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जनसमर्थनाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मला वाटलं नव्हतं की निवडणुकीनंतर इथे पुन्हा अशी सभा घ्यावी लागेल. पण तुम्ही दिलेलं प्रेम इतकं मोठं आहे की सात जन्म घेतले तरी तुमचं ऋण फेडू शकणार नाही. यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेल्या टीकांना त्यांनी तिखट शब्दांत उत्तर दिलं. खासदारांचं काम तुतारी वाजवणं हे असतं, ते तेवढंच करत आहेत. माझ्या कामामुळे कोणाचं पोट दुखतंय, तर त्याबद्दल मी काय करणार? असा पलटवार त्यांनी केला.

मुंडे यांनी आपल्या कामाचा परिघ मराठवाड्यात कसा वाढला, याची विस्तृत उदाहरणांसह चर्चा केली. पाणीपुरवठा योजना, लाडकी बहीण योजना, निराधारांना मदत, हे सर्व प्राधान्याने राबवल्याचं ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यात सर्वाधिक घरकुल आम्ही दिली. या भागात रेल्वेचं मोठं काम केलं. माझ्या हातांनी जे केलं ते लोकांसाठीच केलं. वैद्यनाथ मंदिरासंबंधी आणि काही व्यक्तींमुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या त्रासाचीही त्यांनी आठवण करून दिली. ज्यांनी माझं घर उद्ध्वस्त केलं, त्यांनी माझं मन मात्र तोडू शकलं नाही. जनतेनं मला धरून ठेवलं. असेही मुंडे म्हणाले.

गेल्या वर्षभरात स्वतःच्या प्रकृतीशी झुंज देत काम केल्याचा उल्लेख त्यांनी भावूक होत केला. दोन वेळा मी मृत्यूच्या सावलीतून बाहेर आलो. पण परळीकरांनी माझा हात सोडला नाही. म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. शहराची बदनामी होत असल्याचे आरोप त्यांनी विरोधकांवर ठेवले आणि त्या प्रचाराला मतदानातून उत्तर द्या, असं आवाहन केलं. परळीकरांची शान कुणी कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुम्ही सहन करणार नाही, हे दाखवण्याची वेळ आली आहे. असा संदेश त्यांनी जनतेला दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!