ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार? ; धनंजय मुंडेंची अत्यंत भावनिक साद !

राज्यातील अनेक ठिकाणी नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. “विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर तुमचे काम कोण करणार? अशा कठीण प्रसंगी तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार?” असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना अत्यंत भावनिक साद घातली आहे. परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीसारखेच वातावरण सध्या परळीत असल्याचे सांगत मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “ज्या लोकांनी परळीला जाणीवपूर्वक बदनाम केले, त्या लोकांना चोख उत्तर देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मी तुमचे प्रत्येक कर्तव्य पार पाडले आहे, तुमच्या अडचणी सोडवल्या आहेत. माझ्या दारात आलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. त्यामुळे आपले मत वाया जाऊ देऊ नका आणि कोणतीही गडबड करू नका,” अशी विनंती त्यांनी हात जोडून मतदारांना केली.

मतदारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, “तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. तुम्ही मला प्रत्येक संकटाच्या काळात साथ दिली आहे. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या अंगाच्या कातड्याचे जोडे करून जरी तुम्हाला घातले, तरी मी तुमचे उपकार फेडू शकणार नाही.” हे सर्व उमेदवार निवडून आले तरच माझी ताकद वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे परळी शहराच्या विकासाचा आराखडाही मांडला. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात आयटीआय सुरू करण्याचा मानस असून त्यामुळे रोजगाराला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, अतिक्रमण नियमित करून घरकुले देण्याचे काम आपण केले असून, अल्पसंख्याक मंत्रालय आपल्याकडे असल्याने परळीच्या विकासासाठी मोठा निधी आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेला कोणाला किती मते मिळाली यावर न बोलता, रेल्वेमध्ये येथील जागा जाऊ दिली नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!