नाशिक : वृत्तसंस्था
भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला फोडले आणि आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले असून तो पक्ष पूर्णपणे ‘बाटलेला’ आहे, अशी टीका राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कोकाटे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लढाया युतीच्या पक्षांतर्गतच जास्त दिसत असून विरोधी पक्ष कुठेच जाणवत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट थोडासा उभा असला, तरी तोही ‘बाटलेला’ आहे आणि भाजप तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे जुन्या कार्यकर्त्यांना घरी बसावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, कृषीमंत्री असताना त्यांनी जसे सांगितले तसे आजही त्यांचा ठाम मत आहे की शेतकऱ्यांना कर्ज देण्यापेक्षा ७० टक्के अनुदानावर योजना देण्यात याव्यात. १० ते १५ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून आणि उर्वरित ८५ टक्के खर्च सरकारने करावा. १०० टक्के भांडवली खर्च सरकारने उचलल्यास शेतकऱ्यांचे खरे समाधान होईल आणि त्यांच्या अडचणी कमी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.