नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल यापूर्वी ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबर रोजीच घोषित करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली आहे.
राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. नियोजित कार्यक्रमानुसार मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित होते. मात्र काही प्रभागांबाबत तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदासंदर्भात न्यायालयात आक्षेप नोंदवण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाने त्या प्रभागांत 20 डिसेंबर रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
या परिस्थितीमुळे संपूर्ण निवडणुकांच्या निकालाची तारीख पुढे ढकलत 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्यात यावी, असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला होता. याच आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
आज झालेल्या तातडीच्या सुनावणीत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीचा दिवस 21 डिसेंबरच निश्चित झाला असून यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.