ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“जनतेला संघर्ष, सरकारला फक्त कौतुक” : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सत्ताधारी पक्षाकडून उपलब्धी मांडल्या जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली. “पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे; पण जनतेच्या पदरी मात्र वर्षभरात निराशाच आली,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधत वर्षभराच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

वडेट्टीवार म्हणाले, “महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतमालाला हमीभाव नाही, खत–बियाण्यांचा तुटवडा कायम आहे. मराठवाड्यातील पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.”

यापुढे आरोप करताना त्यांनी सांगितले की, “बिल्डर आणि मंत्र्यांच्या संगनमताने कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. लाडक्या उद्योगपतींना लाभ मिळतो; मात्र सामान्य जनता संघर्ष करत आहे.”  चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “पर्यावरण विभागाने 2023 मध्ये घातलेल्या अटींचा भंग होत आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून झाले नाही. पर्यावरण मंत्री ते वन विभाग अधिकारी यामध्ये सामील असल्याचे दिसते. आम्ही हा मुद्दा विधानसभेत उचलणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारवर लोकशाही व्यवस्थेचा अवमान केल्याचाही आरोप वडेट्टीवारांनी केला. “एक वर्ष होत आले तरी विधान सभा वा विधान परिषद — दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. सरकारला विरोधक नको आहेत, म्हणूनच हे पद जाणूनबुजून रिक्त ठेवले गेले,” अशी टीका त्यांनी केली. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाऐवजी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची मागणीही वडेट्टीवारांनी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!