मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुरबाडमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोलेंनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, असंही नाना पटोले म्हणालेत.
नाना पटोलेंना का प्राधान्य?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.