मथुरा प्रतिनिधी : दाट धुक्यामुळे मंगळवारी पहाटे यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईलस्टोन क्रमांक 127 जवळ 7 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. या धडकेत काही वाहनांना भीषण आग लागली असून, आत अडकलेल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. तसेच सुमारे 150 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच डीएम, एसएसपी यांच्यासह पोलीस व प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस, अग्निशमन दल, NHAI आणि SDRF यांच्या संयुक्त पथकाने बचावकार्य हाती घेतले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे.
अपघाताच्या वेळी जोरदार स्फोटांसारखा आवाज आला. “गोळीबार झाल्यासारखा आवाज झाला. मोठे स्फोट झाले आणि काही क्षणांत संपूर्ण परिसर धुराने आणि आगीने व्यापला,” अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावून गेले. सध्या जखमींची अचूक संख्या सांगणे कठीण आहे. आतापर्यंत सुमारे 20 रुग्णवाहिकांमधून 150 हून अधिक जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.” या अपघातानंतर आगीचे लोळ उठले होते. प्रवासी जीव वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारत होते. सर्वत्र किंकाळ्यांचा आवाज ऐकू येत होता.
एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, “दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती. त्यामुळे हा साखळी अपघात झाला. सात बसेस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्या आणि त्यानंतर बसेसना आग लागली.” प्रत्यक्षदर्शी सुनील कुमार यादव यांनी सांगितले, “आम्ही जौनपूरमधील एका मंत्र्यांच्या निवासस्थानाहून दिल्लीकडे निघालो होतो. अचानक एका वाहनाचा मोठा आवाज आला. आम्ही गाडी थांबवून बाहेर पडलो, तेवढ्यात एकामागून एक बसेस आमच्यावर येऊन आदळल्या. घटनास्थळी भीतीचे वातावरण होते. काही जण बसमधून उतरण्यासाठी झगडत होते, तर काहीजण काचांमधून उड्या मारत होते.”