मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली असून, सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडलेले क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. यासोबतच कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा सध्या राज्यपालांकडे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास सुनावला होता. या शिक्षेला सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची अटक होण्याची शक्यता असून, सध्या ते मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे राजीनामा कधी देणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. सुरुवातीला राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अखेर कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सदनिका घोटाळा प्रकरण कोकाटे यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र असून, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ती मान्य केल्यानंतर कोकाटे पदावरून पायउतार झाले आहेत. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची अतिरिक्त जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, काही काळ ते हे खाते सांभाळणार आहेत.
दरम्यान, केवळ खाते काढून घेऊन नव्हे तर मंत्रिपदाचा संपूर्ण राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत होती. काही दिवसांपूर्वी खाते बदल करून कोकाटे यांचे मंत्रीपद वाचवण्यात आले होते. मात्र, अखेर या प्रकरणात अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट कायम असून, पुढील काही तासांत काय कारवाई होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.