मुंबई : राज्यातील किमान तापमानात झालेल्या घटेमुळे अनेक भागांत थंडीची लाट जाणवत असून उर्वरित राज्यातही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली, तरी थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून शीतलहरी अधिक तीव्र झाल्या आहेत. याचबरोबर वातावरणातील बदल आणि वाढते वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने उच्चांक गाठला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे परिसर गारठला आहे. तालुक्यातील रुई येथे किमान तापमान ४.०७ अंश सेल्सिअस, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ४.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे लासलगाव परिसरातील शिवनदीवर बाष्पयुक्त धुके साचले असून परिसरात नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. मात्र या थंडीचा शेतीवरही परिणाम होत असून द्राक्ष पिकांसाठी ही थंडी अपायकारक ठरत आहे, तर गहू पिकासाठी मात्र पोषक मानली जात आहे.
राज्यातील इतर भागांतही तापमानात मोठी घसरण झाली आहे. धुळे येथे किमान तापमान ५.६ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. गोंदिया, नाशिक, मालेगाव, जळगाव, पुणे आणि नागपूर येथे किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. बीड, परभणी, धुळे आणि निफाड या भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही सकाळच्या वेळी थंडी जाणवत असून दुपारच्या वेळेत मात्र उन्हाचा कडाका अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, देशाच्या इतर भागांत हवामानाचे वेगवेगळे स्वरूप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या काही भागांत सध्या पावसाची स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ७२ तासांत अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याचाही अंदाज आहे.
२१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर, मुझफ्फराबाद आणि लडाख येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर २२ डिसेंबरदरम्यान पंजाबच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांसाठी पंजाब, उत्तराखंड आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.