मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुर्लक्षित झाल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी सनसनाटी आणि बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा आरोप करत शिंदे यांनी, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले कार्य सर्वश्रुत असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, लोकप्रिय व्यक्तींवर आरोप केल्यास त्याची चर्चा होते, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. अशा आरोपांची जितकी निंदा केली तितकी कमी आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, तसेच आपल्या लष्कराच्या शौर्यावरही संशय घेतला जातो, असा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पाकिस्तानचे म्हणणे खरे मानून भारत युद्धात हरला होता, असे वक्तव्य करण्यात काहींना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती आहे? हा देशद्रोह असून देशाशी बेईमानी करण्यासारखा प्रकार आहे. पाकिस्तानप्रेम उफाळून आले असून देशातील जनता अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलतील असा दावा केल्यानंतर आता एपस्टीन फाइल्स आणि पंतप्रधान मोदी यांचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केल्याबाबतही शिंदे यांनी टीका केली. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ चर्चेत राहण्यासाठी पंतप्रधानांबद्दल काहीही बोलले जात असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
मोदींवर जितके आरोप केले जातील, तितकी देशातील जनता पंतप्रधानांच्या पाठीशी अधिक ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.