ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; अनेक ठिकाणी विरोधकांची सरशी

सोलापूर प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या नगरपालिकांमध्ये भाजपविरोधी उमेदवारांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

करमाळा नगरपालिकेत सावंत गटाच्या शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत विजयी झाल्या आहेत, तर मोहोळ नगरपालिकेत शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी अवघ्या १७० मतांनी विजय मिळवला आहे. मंगळवेढ्यातून सुनंदा आवताडे या विजयी झाल्याने भाजपचा अपेक्षित प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सांगोला, पंढरपूर, अकलूज आणि कुर्डूवाडी येथेही भाजपला धक्का बसत विरोधकांनी आघाडी घेतली आहे. सांगोल्यात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाचे आनंद माने आघाडीवर असून, पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके, अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार, तर कुर्डूवाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दुसरीकडे, बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी येथे भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असली, तरी एकूण चित्र पाहता सोलापूर जिल्ह्यात भाजपसाठी ही निवडणूक अपेक्षेपेक्षा कठीण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही या निकालाचा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!