ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नगरपरिषद निकालानंतर वाद: नाशिक-छत्रपती संभाजीनगरात हिंसाचार; 9 जखमी

नाशिक वृत्तसंस्था : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. 288 नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 213 जागा जिंकल्या, भाजप 118, शिवसेना 58, राष्ट्रवादी 37 आणि काँग्रेस 31 जागांवर विजयी ठरली, तर ठाकरे गटाला फक्त 9 जागा मिळाल्या.

नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 च्या निकालानंतर मोमीनपुरा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवामुळे हाणामारी झाली. शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, ज्यात तीन पुरुष व एक महिला जखमी झाले. सर्व जखमींना येवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तक्रार नोंदवली आहे.

याचबरोबर छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये दोन पराभूत उमेदवारांच्या गटात वाद निर्माण झाला, त्यानंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली आणि पाच जण जखमी झाले. दोन्ही उमेदवारांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली.

या घटनांनी नगरपरिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय हिंसेची चिंतेची स्थिती निर्माण केली आहे. पोलिस सध्या घटनास्थळी तपास करत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!