नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे धक्कादायक प्रकार समोर येत असून, त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलने सुरू असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या अस्थिर परिस्थितीत भारतीय व्हिसा कार्यालयांवरही हल्ले झाले. चितगाव येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्त कार्यालयावर जमावाने दगडफेक केल्याची घटना 19 डिसेंबरच्या रात्री घडली. या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चितगावमधील व्हिसा केंद्र तात्काळ बंद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय घेत बांगलादेशातील खुलना, राजशाही आणि चितगाव येथील व्हिसा सेवा निलंबित केल्या. भारताच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशाने भारतातील सर्व व्हिसा सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव आणखी तीव्र झाला आहे. दरम्यान, सीमेवरील सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बांगलादेशातील वाढती अस्थिरता आणि पाकिस्तानकडे झुकणारी भूमिका लक्षात घेता, भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
या सर्व अडचणी असूनही भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून व्हिसा सेवा शक्य तितक्या सुरू ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचा संदेश दिला आहे. त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचे आवाहन केले. ढाकामध्ये परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी चितगावसह काही भागांतील वातावरण अजूनही चिंताजनक असल्याचे चित्र आहे.