ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंस्टाग्रामवर ‘लाईक’पर्यंत ठीक, कमेंटवर बंदी; लष्कराचे नवे सोशल मीडिया धोरण

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय लष्कराने जवानांच्या सोशल मीडिया वापराबाबत महत्त्वाचे आणि कडक धोरण जाहीर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयानुसार, जवानांना इंस्टाग्रामवर रील्स, फोटो आणि व्हिडिओ पाहण्याची मुभा देण्यात आली असली, तरी कोणत्याही पोस्टवर कमेंट करण्यास मनाई करण्यात आली आहे. यूट्यूब आणि X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठीच करता येणार आहे.

व्हॉट्सॲप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग ॲप्सवर गोपनीय नसलेली माहिती शेअर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लिंक्डइन, स्काईप आणि सिग्नलसारख्या ॲप्सच्या वापरासाठीही लष्कराने स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या धोरणामुळे जवानांकडून होणारा माहितीचा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने गेल्या महिन्यात आपल्या नव्या कोट कॉम्बॅट गणवेशाच्या (डिजिटल प्रिंट) डिझाइनचे पेटंट घेतले आहे. हा त्रि-स्तरांचा गणवेश सर्व हवामानात सैनिकांसाठी अधिक आरामदायक ठरणार आहे. लष्कराच्या परवानगीशिवाय हा गणवेश तयार करणे, विकणे किंवा वापरणे कायदेशीर गुन्हा ठरणार असून, उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. हा गणवेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट), दिल्ली आणि आर्मी डिझाइन ब्युरो यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आला आहे.

याचबरोबर, केंद्र सरकारने माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) भरतीसाठी माजी अग्निवीरांचे आरक्षण 10 टक्क्यांवरून थेट 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यासंदर्भात 18 डिसेंबर रोजी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

तसेच, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार असून, पुढील तुकड्यांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे देशसेवा केलेल्या अग्निवीरांना सुरक्षा दलांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!