मुंबई वृत्तसंस्था : “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” या जबरदस्त थीमसह बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेची लाट उसळली आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार उपस्थितीमुळे आणि अर्थपूर्ण संवादांमुळे यंदाचा सिझन केवळ मनोरंजनापुरता न राहता स्पर्धकांच्या नशिबाचा खेळ ठरणार, याचे संकेत मिळत आहेत.
प्रोमोमध्ये रितेश भाऊंचे कोड्यातून खेळ मांडणारे संवाद, हटके लूक आणि दमदार स्वॅग हे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. “फॅन्सचा जीव जडला की ते पाठ सोडत नाहीत आणि आपण शब्द दिला की मागे हटत नाही,” अशा ठाम शब्दांत त्यांनी यंदाच्या खेळाची पातळी उंचावली आहे. दारामागे दडलेले ट्विस्ट, अचानक बदलणारे डावपेच आणि नशिबाची उलथापालथ यामुळे प्रत्येक क्षण थरारक ठरणार, असा इशारा हा प्रोमो देतो.
घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलेला जंगी थाट आणि दारापल्याड लपलेली रहस्ये—यामुळे खेळात कोण पास होणार, कोण फेल ठरणार, हे क्षणाक्षणाला बदलणार आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन येत्या ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. नवा खेळ, नवे ट्विस्ट आणि नशिबाला कलाटणी देणारा हा सिझन महाराष्ट्राला खिळवून ठेवणार, यात शंका नाही.