दूध हे संपूर्ण पोषण देणारे नैसर्गिक पेय मानले जाते. लहानपणापासूनच “दूध प्या, मजबूत व्हा” असा सल्ला दिला जातो. कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी समृद्ध असलेले दूध हाडे-दात मजबूत ठेवते, शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते दूध जितके फायदेशीर आहे, तितकेच काही परिस्थितीत आणि काही लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते—विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी.
दुधातील ट्रिप्टोफॅनमुळे शांत झोप लागण्यास मदत होते, तर कोमट दूध पचन सुधारते. तरीही काही विशिष्ट आरोग्य समस्यांमध्ये रात्री दूध पिणे टाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊयात अशाच ५ प्रकारच्या लोकांबद्दल, ज्यांनी रात्री दूध पिण्यापासून दूर राहावे.
१) वजन वाढीची समस्या असलेले लोक
ज्या व्यक्तींना लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनी रात्री दूध पिणे टाळावे. दुधातील चरबी आणि कॅलरीज रात्री शरीरात साठतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
२) सायनस, खोकला व सर्दीचे रुग्ण
सायनस किंवा सतत खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांमध्ये दूध श्लेष्माचे उत्पादन वाढवते. त्यामुळे रात्री दूध पिल्यास घसा बसणे, कफ वाढणे आणि श्वसनाचे त्रास वाढू शकतात.
३) मधुमेह (टाइप-२) असलेले रुग्ण
दुधामध्ये लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. रात्री दूध पिल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी रात्री दूध टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
४) लॅक्टोज असहिष्णुता असलेले लोक
ज्यांना दूध पिल्यानंतर पोटदुखी, अतिसार, गॅस किंवा सूज येते, त्यांना लॅक्टोज असहिष्णुतेची समस्या असू शकते. अशा लोकांनी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळणे अधिक सुरक्षित ठरते.
५) गॅस, अपचन व अॅसिडिटीचा त्रास असलेले लोक
रात्री दूध पिल्याने काही लोकांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात. गॅस, छातीत जळजळ किंवा अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी रात्री दूध न पिणे हितावह ठरते.