ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पीएम किसानच्या 22व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल! फार्मर आयडी सक्तीचा, नाहीतर थांबेल अनुदान

मुंबई वृत्तसंस्था : पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली असून देशभरात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचे तब्बल 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून दरवर्षी 6 हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जातात. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. आता नव्या वर्षात पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असला, तरी त्याआधी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. या अटीनुसार, फार्मर आयडी जोडल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि शेतकरी योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, याची अचूक माहिती मिळावी यासाठी ‘फार्मर आयडी’ प्रणाली राबवण्यात येत आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचे डिजिटल ओळखपत्र आहे. या आयडीमध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, जमिनीचे क्षेत्रफळ, शेत कुठे आहे, सध्या कोणते पीक घेतले आहे, यासह सर्व तपशील डिजिटल स्वरूपात नोंदवला जातो. त्यामुळे भविष्यात शेतकरी योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने देणे सोपे होणार आहे.

फार्मर आयडी कसा तयार कराल?

पहिली स्टेप :
फार्मर आयडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम AgriStack Portal वर जाऊन ‘Create New User’ या पर्यायावर क्लिक करावा लागेल. अटी व शर्ती स्वीकारून फॉर्म सबमिट केल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

दुसरी स्टेप :
यानंतर नवीन पासवर्ड तयार करून तो सेव्ह करावा. नवीन युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. लॉगिन झाल्यावर ‘Farmer Type’ मध्ये ‘Owner’ हा पर्याय निवडा. त्यानंतर ‘Fetch Land Detail’ वर क्लिक करून जमिनीचा खासरा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा.

तिसरी स्टेप :
आता संपूर्ण माहितीचे व्हेरिफिकेशन करा. ‘Social Registry Tab’ मध्ये फॅमिली आयडी किंवा रेशन कार्डची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर ‘Department Approval’ मध्ये ‘Revenue Department’ निवडा. शेवटी ‘Consent’ वर टिक करून डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर फार्मर आयडी तयार होईल.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून तो आपल्या पीएम किसान खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा येत्या हप्त्याचा लाभ मिळण्यास अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!