मुंबई वृत्तसंस्था : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा ही टीम इंडियातील दिग्गज खेळाडूंसाठी कसोटी ठरत असताना, टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र या परीक्षेत पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षापासून सूर्या फॉर्मच्या शोधात झुंज देत असून, त्याचा फ्लॉप शो अद्याप थांबलेला नाही. कर्णधारपद नसते, तर त्याची संघातून कधीच गच्छंती झाली असती, अशी चर्चा आता क्रीडाप्रेमींमध्ये रंगू लागली आहे.
मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळणारे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या स्पर्धेत दोघांनीही वारंवार निराशा केली आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या मधल्या फळीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. सुमार कामगिरी अशीच सुरू राहिली, तर वर्ल्डकप जिंकणे अवघड ठरेल, असा सूर क्रिकेटप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
८ जानेवारीला झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात हा फॉर्मचा प्रश्न पुन्हा ठळकपणे समोर आला. पंजाबने ४५.१ षटकांत २१६ धावांवर सर्वबाद होत मुंबईसमोर २१७ धावांचे आव्हान ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अडखळती झाली. २५ धावांत मुशीर खान बाद झाला, तर ९० धावांवर अंगकृश रघुवंशी पॅव्हेलियनमध्ये परतला. सरफराज खान आणि अंगकृश यांनी डाव सावरत संघाला ३ बाद १३९ धावांपर्यंत नेले.
याच टप्प्यावर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्याकडून सामन्याला कलाटणी देण्याची अपेक्षा होती. मात्र, दोघांनीही अपेक्षाभंग केला. सूर्यकुमार यादवने १२ चेंडूंत केवळ १५ धावा केल्या, तर शिवम दुबे ६ चेंडूंत १२ धावा करून बाद झाला. अखेर मुंबईला हा सामना अवघ्या एका धावेने गमवावा लागला, जो संघातील मोठ्या नावांमुळे अधिकच बोचरा ठरला.
सूर्यकुमार यादवचा हा फ्लॉप शो २०२४ पासून सुरू आहे. २०२४ मध्ये त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर तो सातत्याने अपयशी ठरत आहे. २०२५ वर्षात तर त्याची कामगिरी अधिकच निराशाजनक ठरली आहे. विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशविरुद्ध त्याने फक्त २४ धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या तीन टी20 सामन्यांत अनुक्रमे ५, १२ आणि ५ धावांवरच समाधान मानावे लागले. शिवम दुबेनेही हिमाचलविरुद्ध केवळ २० धावा केल्या होत्या.
टी20 वर्ल्डकपच्या तोंडावर कर्णधार आणि प्रमुख फलंदाजांचा असा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत असून, आगामी काळात निवड समिती आणि संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.