ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंडर 19 वर्ल्ड कपआधीच वैभवचा ट्रेलर! स्कॉटलंडविरुद्ध वादळी खेळी

मुंबई वृत्तसंस्था : अंडर 19 टीम इंडियाने कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात 2026 वर्षाची तडाखेबंद सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावरच क्लिन स्वीप देत 3-0 असा एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारताने आता अंडर 19 वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. वर्ल्ड कपपूर्वीच्या सराव सामन्यात वैभवने केलेली वादळी खेळी म्हणजेच आगामी स्पर्धेचा थेट ट्रेलरच ठरला आहे.

झिंबाब्वे आणि नामिबियात 15 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत असून, त्याआधी 10 जानेवारीपासून सराव सामन्यांचा थरार रंगू लागला आहे. या मालिकेतील पहिल्याच सराव सामन्यात वैभव सूर्यवंशीने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. चौफेर फटकेबाजी करत वैभवने आपली मर्जी चालवली आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांना कोणतीही उसंत दिली नाही.

वैभव शतकापासून अवघ्या चार धावांनी दूर राहिला, मात्र त्याची 96 धावांची खेळी हीच वर्ल्ड कपमधील मुख्य सामन्यांसाठी तो पूर्णपणे तयार असल्याची जाहीर घोषणा ठरली. वैभवने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आपला आक्रमक स्वभाव दाखवून दिला. अर्धशतकानंतरही त्याने हाच वेग कायम ठेवला, मात्र दुर्दैवाने तो शतक पूर्ण करू शकला नाही.

50 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावा करणाऱ्या वैभवसाठी ही सलग तिसरी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी ठरली आहे. याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या यूथ वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत अनुक्रमे 68 आणि 127 धावा ठोकल्या होत्या. बॅटिंगसोबतच कर्णधार म्हणूनही वैभवने या मालिकेत ठसा उमटवला आहे.

दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक कामगिरीमुळे आता प्रतिस्पर्धी संघांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध होणार असून, वैभव त्या सामन्यात काय करतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. वैभवची फॉर्म पाहता अमेरिकन संघाला धडकी भरली नसेल, तरच नवल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!