ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसेला मोठा धक्का! डोंबिवलीचे शहराध्यक्ष मनोज घरत समर्थकांसह भाजपात दाखल

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मनोज घरत यांनी कमळ हाती घेतल्याने डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डोंबिवलीत मनसेचा प्रमुख चेहरा असलेल्या मनोज घरत यांचा गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी, विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत संघर्ष सुरू होता. पॅनल रचनेतील गोंधळ, उमेदवारीबाबतची नाराजी आणि प्रचारातील विसंवाद यामुळे ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी जड अंतकरणाने मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

प्रवेशानंतर बोलताना मनोज घरत यांनी मनसे-उबाठा पॅनलमधील अंतर्गत विसंवादावर गंभीर आरोप केले. एकाच पॅनलमध्ये मनसे आणि उबाठा गटाचे उमेदवार उतरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वरिष्ठांचे आदेश पाळले गेले नाहीत आणि अशा परिस्थितीत ठाकरे ब्रँड जनतेसमोर कसा न्यायचा, हा प्रश्न आमच्यासमोर होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असून केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी सत्ताधारी पक्षातूनच मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या पक्षांचे या ठिकाणी फारसे वजन नसल्यामुळे सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. आपण भाजपमध्ये तिकीटासाठी प्रवेश केलेला नसून, मनसेसोबतचा २० वर्षांचा प्रवास लक्षात घेता हा निर्णय जड अंतकरणाने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना आणि भविष्यातील विकासकामांचा विचार करणे आवश्यक होते, असे मनोज घरत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!