जम्मू–काश्मीर वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर भारत–पाकिस्तानदरम्यान तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू–काश्मीरमधील सांबा, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ (LOC) संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन हालचाली आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत ड्रोन पाठवण्यात आल्याचे स्पष्ट होताच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तातडीने गोळीबार करत तपास अभियान सुरू केले.
राजौरी जिल्ह्यातील तेरयाथ गावात ड्रोन दिसल्यानंतर ते कालाकोट आणि धरमसाल गावांच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. या ड्रोनमध्ये स्पष्टपणे ब्लिंकिंग लाईट दिसत होत्या. रामगढ सेक्टरमधील बबराल गावाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुसरे ड्रोन काही सेकंद गावावर घिरट्या घालताना दिसले आणि त्यानंतर ते वेगाने पाकिस्तानच्या दिशेने निघून गेले.
पूंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टरमध्ये LOC जवळ सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ड्रोन दिसून आले. येथेही ड्रोनवरील ब्लिंकिंग लाईट स्पष्टपणे दिसत असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सांबा जिल्ह्यातील घगवालच्या पळौरा गावाजवळ ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारतात हत्यार पाठवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये LOC जवळील गनिया आणि कलसिया गावांमध्येही सायंकाळी ड्रोन दिसताच भारतीय सैन्याने जोरदार फायरिंग करून ते पाडण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रोन आढळल्याने पाकिस्तानकडून घुसखोरीचा सुनियोजित प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून भारतात हत्यार आणि दहशतवादी साहित्य पाठवण्याचे प्रयत्न सातत्याने होत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाविरोधात असल्याचा दावा करणारा पाकिस्तान प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्या संपूर्ण सीमाभागात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे.