बांगलादेश क्रिकेट सध्या गंभीर संकटाच्या गर्तेत सापडले असून, मैदानाबाहेरील संघर्षामुळे संपूर्ण व्यवस्थाच ढवळून निघाल्याचे चित्र आहे. भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी न होण्याची भूमिका बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतल्यानंतर आता आणखी एक मोठे वादळ उठले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेयर असोसिएशन यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला असून, खेळाडूंनी बीसीबीच्या फायनान्स कमिटीचे चेअरमन नजमुल हसन यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे.
नजमुल हसन पदावरून दूर होत नाहीत, तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही, अशी कठोर भूमिका खेळाडूंनी घेतली आहे. नजमुल हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा संघर्ष उफाळून आला आहे. बांगलादेशने टी-20 विश्वचषकातून माघार घेतली, तर त्याचे नुकसान खेळाडूंना होईल, बोर्डाला नाही, असे विधान त्यांनी केले होते. इतकेच नव्हे, तर बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू तमीम इक्बाल यांना त्यांनी “भारतीय एजंट” संबोधल्याने क्रिकेट विश्वात संतापाची लाट उसळली आहे.
नजमुल हसन यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, टी-20 विश्वचषकात न खेळल्यास खेळाडूंना कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही. “आपण नुकसानभरपाई का द्यावी? जर ते कुठेही जाऊन काहीही करू शकत नसतील, तर आपण त्यांच्यावर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची परतफेड करावी का?” असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानामुळे खेळाडूंच्या असंतोषाला उधाण आले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. या वादाचा थेट फटका बांगलादेश क्रिकेट लीगवरही बसत असल्याचे दिसून येत आहे.
टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे असताना, बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चर्चेला उधाण आले आहे. आयसीसीने स्पर्धेतून बांगलादेशला वगळले, तरी बोर्डाचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, कारण सामना शुल्क खेळाडूंनाच मिळणार नसल्याचे वास्तव आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका खेळाडूंनाच बसणार आहे.
यापूर्वीही नजमुल हसन यांनी माजी कर्णधार तमीम इक्बाल यांच्यावर टीका केली होती. टी-20 विश्वचषकाबाबत निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा आणि क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला तमीमने दिल्यानंतर, त्यांच्यावर भारताचा एजंट असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता बांगलादेश क्रिकेटमध्ये प्रशासकीय संघर्ष, खेळाडूंचा रोष आणि आंतरराष्ट्रीय दबाव यांचा गुंता अधिकच वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे.