पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे.
ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधील थेरगाव परिसरात ही घटना घडली. निवडणूक निकालानंतर काही तासांतच ही घटना घडल्याने, हा प्रकार राजकीय आकसातून झाला का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती बाटलीतून ज्वलनशील द्रव कारवर ओतताना दिसत असून, त्यानंतर काडेपेटीच्या साहाय्याने कारला आग लावून तो घटनास्थळावरून पळ काढतो. काही क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याचे दृश्य फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित जाळपोळीचा प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
आकाश बारणे यांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच हा प्रकार केल्याचा थेट आरोप केला असून, याप्रकरणी त्यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे.
मात्र, घटना उघडकीस येऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे असतानाही कारवाईला विलंब का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून केला जात आहे. या घटनेनंतर थेरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक निकालानंतर राजकीय वाद हिंसक स्वरूप धारण करत असल्याचे चित्र दिसत असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. राजकीय मतभेद हे लोकशाहीचा भाग असले तरी, त्यातून जाळपोळ व मालमत्तेचे नुकसान होणे गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.