सोलापूर : वृत्तसंस्था
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल (जि. रायगड) येथील सहा मित्र एर्टिगा कार (क्रमांक MH-46 Z 4536) मधून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. देवडी पाटी परिसरात आल्यानंतर भरधाव वेगातील कारवरील चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे कार महामार्गापासून सुमारे १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमध्ये ३ पुरुष व ३ महिला असे सहा प्रवासी होते. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह वाहनात अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला गंभीर जखमी अवस्थेत बचावल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. जखमी ज्योती टाकले यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्रीची वेळ, भरधाव वेग व वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींची सविस्तर ओळख पटविण्याचे काम सुरू असून सर्व मृत पनवेल परिसरातील रहिवासी व एकमेकांचे मित्र असल्याचे समजते. महामार्गापासून दूर झुडपांमध्ये कार अडकल्याने बचावकार्यात काही अडचणी निर्माण झाल्या. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर अचानक ओढावलेल्या या संकटाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.