ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ओशिवरा गोळीबार प्रकरण उघड; अभिनेता कमाल रशीद खान पोलिसांच्या ताब्यात

मुंबई  : वृत्तसंस्था

अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा संध्याकाळी केआरकेला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत केआरकेने गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतूनच झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याची बंदूक जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे.

१८ जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीतील एका निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोन गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली. यापैकी एक फ्लॅट लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा यांचा, तर दुसरा मॉडेल प्रतीक बैद यांचा असल्याचे समोर आले आहे.

सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमधून ठोस धागेदोरे मिळाले नव्हते. मात्र, फॉरेन्सिक तपासणीत गोळ्या केआरकेच्या बंगल्यातून झाडल्या गेल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निष्कर्षानंतर पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवत केआरकेला ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास ओशिवरा पोलीस करीत असून, घटनेमागील नेमका उद्देश व परिस्थितीचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!