---Advertisement---

ओव्हरटेकचा जीवघेणा फटका; टेंभुर्णीजवळ बस-कार भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, वृद्धा गंभीर

By team
On: January 29, 2026 10:59 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था 

टेंभुर्णी–बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल्या खासगी बसने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद (वय ५७), सुनिता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद (वय ५०) दोघे रा. बुवासाहेब नगर, कोळकी (ता. फलटण, जि. सातारा) तसेच शारदा संभाजी राऊत (वय ६५, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. तर मुक्ताबाई कल्याण राऊत (वय ७०, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपकार काशीद हे पत्नी, सासू व चुलत सासू यांच्यासह त्यांच्या ताब्यातील कारमधून (एमएच ११ सीजी ९०६६) माढा येथे लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न उरकून दुपारी फलटणकडे परतत असताना टेंभुर्णी जवळ समोरून येणाऱ्या रोहा–पुणे–लातूर मार्गावरील बसने (एमएच १४ एमएच ०१९८) पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक कारच्या दिशेने बसचे तोंड वळवले आणि समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर गंभीर जखमींना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातात कारचे अंदाजे दीड लाख रुपये तर बसचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अनिल जगन्नाथ यादव (वय ५०, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक जोतिराम भीमराम जाधव (रा. गीतानगर, पणदरे, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!