मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

अजित पवारांना शरद पवारांसोबतच जाण्याची इच्छा; शशिकांत शिंदे

By team
On: January 30, 2026 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ओळख ही पवार कुटुंब असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, आम्ही सर्वजण त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहू, अशी ठाम भूमिका मांडली आहे. अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही त्याग करावा लागेल, तो करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, पवार कुटुंबाला मानणारा मोठा जनाधार जर एकत्र आला असता, तर २०२९ मध्ये अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले असते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि मतांचे विभाजन यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रमुख नेत्यांच्या पाच ते सात बैठका झाल्या होत्या. या बैठकींमध्ये पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत कोणते मुद्दे घ्यायचे, यावर सविस्तर चर्चा झाली होती. मात्र त्याच दरम्यान निवडणुका जाहीर झाल्याने ही प्रक्रिया पुढे नेता आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आठ ते दहा दिवसांपूर्वी अजित पवार आणि आम्ही जयंत पाटील यांच्या बंगल्यावर एकत्र बसलो होतो, अशी माहिती देताना शिंदे म्हणाले की, एकत्रीकरणात अडथळे येऊ नयेत आणि मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर ९ ते १० तारखेपर्यंत अंतिम निर्णय म्हणजेच ‘सोक्षमोक्ष’ लावायचा, असेही ठरले होते. मात्र तो निर्णय होऊ शकला नाही आणि एकत्रीकरणाचे स्वप्न अपूर्णच राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नेतृत्वाच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, कोण नेतृत्व करतो यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होणे अधिक महत्त्वाचे आहे. पवार कुटुंबाने एकत्र येऊन नेतृत्वाचा निर्णय घ्यावा. नाव कुणाचेही पुढे आले तरी आम्ही त्या नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्याकडे प्रशासनावर मजबूत पकड आणि ठोस निर्णयक्षमता होती. त्यांना संधी मिळाली असती तर राज्यातील राजकारणाचे वेगळे चित्र दिसले असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा विचार त्यांच्या मनात कायम होता, कारण मतांचे विभाजन होऊ नये, हीच त्यांची भूमिका होती.

अजित पवार यांच्या भावनिक बाजूवर प्रकाश टाकताना शशिकांत शिंदे म्हणाले की, एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यानंतर अजित पवार अनेकदा फोन करून प्रचार, सभा आणि रणनीतीबाबत चर्चा करत असत. शरद पवार यांना पाहिल्यानंतर अजित पवार अधिक भावनिक होत असत. शरद पवारांसोबतचे नेतृत्व पुन्हा एकत्र यावे, त्यासाठी कितीही त्याग करायला तयार आहे आणि आता शरद पवारांसोबतच जायला पाहिजे, हीच त्यांची मानसिकता होती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment