मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एक कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये थेट जीवे मारण्याची भाषा वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन पेटवले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचाही मुद्दा सातत्याने उपस्थित केला होता. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनाक्रमामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यातील राजकीय वितुष्ट अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट मनोज जरांगे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा करताना ऐकू येतो. तसेच धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची नावे पुन्हा घेऊ नयेत, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचेही या क्लिपमध्ये स्पष्ट होते. यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची नावे घेऊन धमकावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून, “जर गोळ्या घातल्या नाहीत, तर मुंडे आणि कराड यांची नावे पुन्हा घेऊ नका,” अशी भाषा वापरण्यात आल्याचे ऐकू येते. या प्रकारामुळे मराठा समाजात एकच खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती कोण आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपली सुपारी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात काही जणांना अटकही झाली होती. मात्र, पुढील तपासात ठोस निष्कर्ष समोर आला नव्हता. आता पुन्हा धमकीचे प्रकरण उघडकीस आल्याने, या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.