---Advertisement---

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवारांची पहिलीच भेट; राजकीय वर्तुळाचे लक्ष

By team
On: February 4, 2026 6:05 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटीत जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही दोघांची पहिलीच भेट ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यापूर्वीही सहयोग सोसायटी राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरली होती. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडले. त्या काळात सहयोग सोसायटी, गोविंदबाग आणि मुंबईतील देवगिरी बंगला येथे वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळाले होते.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले. अस्थीविसर्जनाच्या दिवशी त्यांनी नीरा नदीच्या पाहणीसाठी भेट देत स्थानिक कार्यकर्त्यांकडून दूषित पाण्याबाबत माहिती घेतली होती. शरद पवार आणि त्यांच्या गटातील अनेक नेत्यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी आम्ही एनडीएसोबतच राहणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, असे विधान केले होते. यावर शरद पवारांनी आक्षेप घेत, “राष्ट्रवादीबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले होते.

आता शरद पवार थेट सहयोग सोसायटीत जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याने, या भेटीत नेमकी काय चर्चा होते, विलीनीकरणाबाबत काही ठोस संकेत मिळतात का, की ही केवळ कौटुंबिक भेट ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ही भेट कौटुंबिक असल्याचेही बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या घडामोडींमुळे पवार कुटुंबाची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आज पवार कुटुंबातील सदस्य सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी एकत्र जमल्याची माहिती आहे. मात्र, राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता या भेटीचे अर्थ अनेक पातळ्यांवर काढले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!