---Advertisement---

मोहोळमध्ये ईव्हीएमवरून मध्यरात्री गदारोळ; हॉटेलमध्ये राखीव मशीन्स आढळल्याचा दावा !

By team
On: February 8, 2026 10:50 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था 

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरालगत असलेल्या हॉटेल स्वराज्य व बारच्या परिसरात दोन सीलबंद ईव्हीएम मशीन आढळून आल्या. याबाबत उमेश पाटील यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारत हा प्रकार उघडकीस आणला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी उमेश पाटील यांनी आरोप केला की, “मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारे ईव्हीएम मशीन हॉटेलमध्ये आढळणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

या गदारोळानंतर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मोहोळचे तहसीलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सांगितले की, सदर ईव्हीएम मशीन या राखीव स्वरूपातील असून त्यांचा प्रत्यक्ष मतदानासाठी कुठेही वापर करण्यात आलेला नाही. मतदानासाठी वापरलेल्या सर्व ईव्हीएम मशीन रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरक्षितपणे स्ट्रॉन्ग रूम मध्ये जमा करून ती रूम सील करण्यात आली आहे. संबंधित राखीव मशीन्स अद्याप सीलबंद अवस्थेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या मशीन्स हॉटेल किंवा बारच्या परिसरात का नेल्या जात होत्या, याबाबत प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सरासरी ६५.९० टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का सुमारे १ टक्क्याने घसरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७०.५५ टक्के मतदान सांगोला तालुक्यात, तर सर्वात कमी ५८.३९ टक्के मतदान दक्षिण सोलापूर तालुक्यात झाले आहे. या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!