मुंबई : इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड सुरु असली तरी पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली. मुंबईत पेट्रोल ९३ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोलने ८६ चा टप्पा ओलांडला आहे. तर कोलकात्यात डिझेल पहिल्यांदाच ८० रुपयांवर गेले आहे.
आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८६ रुपये आहे. एक लीटर डिझेलसाठी मुंबईतील ग्राहकांना ८३.३० रुपये मोजावे लागतील. प्रजासत्ताकदिनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली होती. या दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांनी आपल्या तुंबड्या भरायला लावल्या असून केंद्र सरकार ढीम्म असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे.