अजित पवारांचा मृत्यू स्वीकारणं कठीण; रोहित पवारांनी मांडले अपघाताचे प्रश्न

मुंबई : वृत्तसंस्था

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या अपघातावर शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. “अजितदादांचा मृत्यू झाला, यावर विश्वास बसत नव्हता. आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती आणि सादरीकरण मांडले. “दादा परत आले, तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल, अशी इच्छा आजही मनात आहे. मात्र वास्तव स्वीकारावे लागते,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोहित पवार म्हणाले की, या अपघाताबाबत आम्ही आमच्या परीने शक्य ती माहिती गोळा केली आहे. “सरकारी यंत्रणांनी जर अधिक प्रभावीपणे काम केले, तर या अपघाताचे रहस्य लवकरच उघड होईल,” असे सूचक विधानही त्यांनी केले.

अफवांमुळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना रोहित पवार यांनी एक प्रसंग सांगितला. पिंपरी-चिंचवडमध्ये सिग्नलला थांबले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना ९ तारखेला अजितदादांबाबत काही सांगणार असल्याबद्दल विचारणा केली होती. काहींनी दादा परत येतील असे भावनिक व्हिडिओ टाकले, तर काहींनी विमानात सहा जण होते आणि पार्थिव सापडले नाही, अशा अफवा पसरवल्या. यामुळेच लोकांना सत्य कळावे म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी रोहित पवार अत्यंत भावुक झाले. अपघातानंतर सलग सहा दिवस हे सर्व एका वाईट स्वप्नासारखे वाटत होते, असे त्यांनी सांगितले. “जेव्हा अपघातस्थळावरून मिळालेल्या वस्तू पाहिल्या—जळालेला स्वेटर, चप्पल आणि दादांच्या हातातील घड्याळ—तेव्हा वास्तव समोर आले. दादा नेहमी घड्याळ १५ मिनिटे पुढे ठेवायचे. त्या घड्याळात ९ वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून दादा आता आपल्यात नाहीत, याची खात्री पटली,” असे त्यांनी सांगितले.

अजित पवारांवरील प्रेमापोटीच हा सारा तपशील समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित पवार म्हणाले. “आम्ही सत्तेत नसतानाही जे शक्य आहे ते केले. दादा आणि साहेब नेहमी सांगायचे—प्रयत्न करत राहा. त्याच विचारातून लोकांना नेमके काय घडले हे कळावे, हीच आमची भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Don`t copy text!