झिरवाळांच्या कार्यालयातील लाचकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी

मुंबई :  वृत्तसंस्था 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ठिणगी उडाली आहे. या प्रकरणामागे भाजपचा हात असू शकतो, असा संशय काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली. मंत्रालयातच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंत्री झिरवाळ यांनी प्रतिक्रिया देताना, “या प्रकरणाशी माझा थेट संबंध आढळल्यास मी तत्काळ राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका घेतली.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले. “नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडणे हे भाजपचे राजकीय षडयंत्र असू शकते. विरोधकांना आणि मित्रपक्षांना बदनाम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे हा त्यांचा जुना पायंडा आहे,” असे त्या म्हणाल्या.

महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी “हे टक्केवारीचे सरकार आहे. मंत्रालयातसुद्धा टक्केवारीचा हिशोब सुरू आहे. कोणत्याही कार्यालयात जा, टक्केवारीशिवाय काम होत नाही. प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात उघडपणे टक्केवारी मागितली जाते,” असा आरोप केला. स्वतः ‘टक्केवारी’च्या चिखलात अडकलेल्या सरकारने इतरांवर चिखलफेक करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “सध्या शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. टॅरिफच्या मुद्यावर केंद्र सरकार मौन बाळगून आहे. सरकारचे निर्णय बळीराजाच्या विरोधात जात आहेत,” असे त्या म्हणाल्या. “भाजपने देश अमेरिकेला विकला आहे. पंतप्रधान स्वतःला ‘विश्वगुरू’ समजतात, पण साधी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. ते महिलांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण तापले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाचखोरी प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment