भाजप आमदार कार्यालयात धक्कादायक बॅग, एअरगन आढळले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात आज सकाळी एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने ही बॅग कार्यालयात ठेवली होती. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना वाटले की ही बॅग कुणी विसरली असेल, परंतु सकाळपर्यंत कोणताही संपर्क झाला नाही. संशय आल्यावर बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये पिस्तुल आढळल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केनेकर यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी धाव घेत बॅग आणि तिच्यातील वस्तू ताब्यात घेतली. प्राथमिक तपासात हे पिस्तुल प्रत्यक्षात एअरगन असल्याचे स्पष्ट झाले, तरीही सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.

वरिष्ठ अधिकारी पंकज अतुलकर घटनास्थळी दाखल झाले आणि आमदार केनेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून बॅग कोणत्या वेळी, कोणत्या व्यक्तीने ठेवली आणि कोणत्या दिशेने निघून गेली, याचा मागोवा घेतला जात आहे. कार्यालयातील ये-जा करणाऱ्या व्यक्तींची नोंद आणि संबंधित कागदपत्रांची छाननी करून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत कोणताही गोळीबार झाल्याचे संकेत आढळलेले नाहीत, परंतु ही फक्त विसरलेली बॅग होती की त्यामागे कोणताही वेगळा हेतू होता, याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Don`t copy text!