---Advertisement---

‘ट्रम्प मोदींना आपल्या तालावर नाचवत आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल !

By team
On: February 14, 2026 4:21 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अत्यंत जहरी टीका केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले असून ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारावरून विरोधकांकडून टीका होत असताना आंबेडकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे भवितव्य अमेरिकेच्या भरवशावर सोडण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या देशाला पूर्णतः उद्ध्वस्त करत आहेत. मोदी ट्रम्प सांगतील तेच करतात. रशियाकडून तेल खरेदी करायचे नाही, तर करायचे नाही. भारतीय कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी उघडायचे, तर उघडले. टेक्स्टाईलवरील टेरिफ २.५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर गेला, तरीही मोदी ही चांगली गोष्ट असल्याचा दावा करत आहेत.” त्यांनी पुढे म्हटले की, “कदाचित पंतप्रधान मोदी यांची एखादी दुखरी नस ट्रम्प यांच्या हाती लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत.” या सर्व घडामोडी देशासाठी अपमानजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांना पत्र लिहून देशव्यापी आंदोलनाची मागणी केल्याचे सांगितले. “काँग्रेस संसदेत जे करत आहे ते चांगले आहे, पण हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे देशभर आंदोलन उभे करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. देशातील मध्यमवर्ग व सवर्ण समाजातील काही घटक पंतप्रधान मोदी धर्म व जात व्यवस्थेला पुन्हा बळ देत असल्याचा आरोप करत असल्याचे नमूद करत, “देश सर्वप्रथम आणि त्यानंतर इतर गोष्टी,” या भूमिकेतून आंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंबेडकर यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या विधानांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!