---Advertisement---

शिवनेरी किल्ला येथे शासकीय सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात जन्मोत्सव साजरा !

By team
On: February 19, 2026 10:24 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिषेक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक शिवनेरी किल्ला येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनी शिवनेरी गडावर उपस्थित राहून शासकीय कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर येथे शिवाई देवी आणि शिवरायांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. गडावर पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण-तरुणींचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

राज्यातील इतर भागांतही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कल्याण येथे ४२२ किल्ल्यांच्या नावांमधून साकारलेले शिवछत्रपतींचे तेजोमय पोर्ट्रेट विशेष आकर्षण ठरले. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी दोन दिवसांच्या परिश्रमातून ही अनोखी कलाकृती उभी केली.

धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिर येथेही शिवजयंतीनिमित्त विशेष सोहळा पार पडला. तुळजाभवानी ही शिवरायांची दैवत मानली जात असल्याने देवीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजा आणि शिवअभिषेक करण्यात आला. ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत जयघोष केला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

एकूणच, राज्यभरात शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक अभिमान आणि शिवभक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. ढोल-ताशांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या लहरीत शिवरायांच्या कार्याची आठवण करत महाराष्ट्राने आजचा दिवस जल्लोषात साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!