---Advertisement---

बारावीचे फिजिक्स-केमिस्ट्री पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर लीक !

By team
On: February 21, 2026 10:50 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर :  वृत्तसंस्था

बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत बारावी (HSC) व दहावी (SSC)च्या परीक्षा सुरू आहेत. राज्यभर ‘कॉपीमुक्त परीक्षा’ राबविण्याचा सरकारचा प्रयत्न असताना नागपूरमध्ये दोन विषयांचे पेपर फुटल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर होता. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत असल्याची माहिती समोर आली. सेंट उर्सुला केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेमार्फत तिची झडती घेतली असता तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला.

मोबाईल तपासल्यावर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच संबंधित प्रश्नपत्रिका एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर झाल्याचे आढळले. या ग्रुपमध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. केंद्रप्रमुखांनी तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर सदर पोलीस ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत दोन विद्यार्थिनींकडून माहिती घेतली असता, एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात पेपर फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रुपमधील उर्वरित १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देणाऱ्या या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!