ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्हीएसआरला ‘रेड कार्पेट’? रोहित पवारांचा मोदी-शहा यांच्याकडे धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार म्हणाले की, तेदेपा आणि व्हीएसआर कंपनीचे अतिशय घनिष्ठ आर्थिक संबंध असून, त्या पक्षाचा खासदार देशाचा उड्डयण मंत्री असल्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी पारदर्शक होईल का, याबाबत गंभीर शंका आहे. मंत्री डीजीसीएच्या माध्यमातून कागदपत्रांत फेरफार करू शकतात, असा आरोपही त्यांनी केला.

तेदेपाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या वित्तीय संस्थेने व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. “तुमच्याच घरचे लोक कंपनीत पैसे गुंतवत असतील, संचालकांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असतील, तर निष्पक्ष चौकशी कशी होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वैयक्तिक लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. व्हीएसआर कंपनीमागे “पॉवरफूल” लोकांचा पाठिंबा असल्याचा आरोप करत डीजीसीएकडून कंपनीला ‘रेड कार्पेट’ वागणूक दिली जात असल्याचेही ते म्हणाले.

विमान खरेदी-विक्री व्यवहारात विम्याचा मुद्दा असल्याचे सांगत रोहित पवार यांनी दावा केला की, संबंधित विमान गुजरातमधील एका उद्योगपतीने विकत घेतल्यानंतर ते व्हीएसआरला ३५ कोटी रुपयांना विकण्यात आले. तसेच अपघातातील वैमानिक पूर्वी जेट एअरवेजमध्ये उच्च पगारावर कार्यरत होते; नंतर नोकरी गेल्यानंतर व्हीएसआरमध्ये कमी पगारावर रुजू झाल्याने ते आर्थिक दबावात होते, असा दावा त्यांनी केला.

कंपनीचे अकाउंटेबल मॅनेजर व्ही. के. सिंह, सेफ्टी ऑफिसर आणि डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करत “अजून चौकशी का झाली नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप असल्याचे नमूद करत निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासाची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित मंत्री किंवा कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. केंद्र सरकार किंवा तेदेपा यांची भूमिका समोर आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!