---Advertisement---

कलबुरगीच्या परिषदेची राज्यस्तरीय दखल; दोन लाखांचा ‘मंगेश पाडगावकर’ पुरस्कार जाहीर

By team
On: February 22, 2026 2:14 PM
Follow Us:
---Advertisement---

कलबुरगी : प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार–२०२५’ (संस्था) साठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा व साहित्याचा प्रसार करण्यासाठी केलेल्या लक्षणीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मराठी भाषेला प्रवाही, समृद्ध आणि लोकाभिमुख ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येते. यंदा संस्थेच्या विभागात कलबुरगी येथील कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेची निवड करण्यात आली असून, पुरस्काराचे स्वरूप रुपये २,००,०००/- (दोन लाख रुपये), सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित चौथे विश्व साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

परिषदेकडून मराठी भाषा, साहित्य, सांस्कृतिक उपक्रम, कवीसंमेलने, ग्रंथप्रदर्शने तसेच राज्याबाहेरील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. कर्नाटकात करीत असलेल्या परिषदेच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरावर दखल घेतल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे. या पुरस्कारामुळे सर्व पदाधिकारी, सभासद आणि मराठी भाषा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिषदेच्या या यशाबद्दल विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!