मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; मुंबई महाराष्ट्राची होती आणि राहणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं.
कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान फक्त त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं आहे. कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. “असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा”, असा टोला संजय राऊत यांनी लक्ष्मण सवदी यांना लगावला. यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत हे कर्नाटकने लक्षात ठेवावं, असा थेट इशाराही राऊत यांनी दिला आहे.